फरीदकोट (पंजाब) – वर्ष १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांपैकी बेअंत सिंगचा मुलगा सरबजीत सिंग याने फरीदकोटमधून अपक्ष म्हणून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याआधीही त्याने पंजाबमधील विविध भागातून संसदीय आणि विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. बारावी नापास असलेला सरबजित खालसा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. ( Indira Gandhi assassin Beant Singh’s son Sarabjit Singh to contest from Faridkot seat in Punjab)
सरबजितच्या विरोधात आम आदमी पक्षाचे करमजित अनमोल आणि भाजपाचे हंस राज हंस यांचे आव्हान आहे. सध्या काॅंग्रेसचे मोहम्म्द सादीक फरिदकोटचे खासदाररासून येथे १ जून रोजी मतदान होणार आहे.
सरबजीतचे वडील बेअंत सिंग हे इंदिरा गांधींचे अंगरक्षक होते. इंदिरा गांधींचा दुसरा अंगरक्षक होता सतवंत सिंग. या दोघांनीच ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या केली होती. तत्कालीन पंतप्रधानांच्या सुरक्षा दलातील इतर रक्षकांनी बेअंत सिंगला लगेचच गोळ्या घालून ठार केले. त्याच्या हत्येत सहभागी असलेल्या सतवंत सिंगला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
पंजाबमधील मोहाली येथील रहिवासी असलेल्या सरबजीतने २००४ मध्ये भटिंडा येथून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्याला १,१३,४९० मते मिळाली होती. त्याने बर्नाला जिल्ह्यातील भदौर विधानसभा मतदारसंघातून २००७ ची पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली आणि त्यावेळी त्याला १५,७०२ मते मिळाली होती.
बसपाच्या तिकिटावर लढवली निवडणूक
सरबजीतने २०१४ ची लोकसभा निवडणूक फतेहगढसाहिब मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढवली आणि त्याला १२,६८३ मते मिळाली. यापूर्वी त्याची आई बिमल कौर खालसा आणि आजोबा सुचा सिंग यांनी शिरोमणी अकाली दल (मान) पक्षाकडून १९८९ ची संसदीय निवडणूक लढवली होती. रोपर आणि भटिंडा मतदारसंघातून बिमल कौर विजयी झाल्या होत्या.