वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय पंतप्रधानांचे कार्यालय आणि भारताच्या राष्ट्रपतींना ट्विटरवरून बेदखल म्हणजेच अनफॉलो केले आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासालाही त्यांनी अनफॉलो केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे ट्विटरवर तब्बल 21 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
तीन आठवड्यांपूर्वी नरेंद्र मोदी हे अमेरिकन प्रशासनाने ट्विटरवर फॉलो केले जाणारे एकमेव राष्ट्रप्रमुख होते. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली आहे असे मानले जात होते. पण त्यांनी मोदींना असे अचानकच बेदखल केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचे कारण मात्र ट्रम्प प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही.
या ट्विटर अकौंटवर शेवटचा संपर्क हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांच्या अनुषंगाने झाला होता. अमेरिकेच्या मागणीनुसार भारताने त्यांना या गोळ्या पुरवल्यानंतर ट्रम्प यांनी ग्रेट, रिअली गुड अशी प्रतिक्रीया त्या ट्विटर हॅंडलवर दिली होती. त्यांनी या मदतीबद्दल भारताचे व मोदींचे आभारही मानले होते. त्यामुळे व्हाईट हाऊस यांनी मोदींना व भारताच्या राष्ट्रपतींना बेदखल करण्याची कृती का केली यावर ट्रम्प प्रशासनाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. त्या संबंधात ट्रम्प प्रशासनाला त्या विषयी विचारणा करणारे अनेक संदेश संबंधितांनी पाठवले होते पण त्यावरही त्यांनी उत्तर दिलेले नाही.