मिथिलेश जोशी
बॉलीवूडमध्ये तुम्हाला कोणी महान बनवू शकत नाही. तसंच सक्षम गुणवत्ता, निर्धार आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्हाला महान होण्यापासून कोणी रोखूही शकत नाही. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे इरफान खान. अक्षरश: शून्यातून सुरवात करणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या दृढनिश्चय आणि अतोनात कष्ट घेण्याच्या वृत्तीतून कोणताही गॉडफादर नसताना हे महानपण मिळवलं. आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने या कलाकाराने आपल्याला नवा सिनेमा कसा असतो हे शिकवले.
आज इरफान गेला. त्याच्या सलाम बॉम्बेतील छोट्या भूमिकेपासून सुरू झालेला हा अफाट, अचंबित करणारा प्रवास त्यामुळेच डोळ्यापुढे तरळतोय. अकादमी ऍवॉर्ड विजेत्या सलाम बॉम्बे या 1998 मधील चित्रपटातील अवघ्या दोन मिनिटांच्या भूमिकेपासून इरफानने आपली बॉलीवूडची इनिंग सुरू केली.त्या भूमिकेला समीक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे त्याला बॉलीवूडमधील स्मॉल बजेट फिल्ममध्ये सपोर्टींग रोल मिळाले. त्यातूनच विशाल भारद्वाजचा मकबूलमध्ये मध्यवर्ती भूमिका मिळाली.
बॉलीवूडमधील गुन्हेगारीवरील चित्रपटात मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाने इरफानला बॉलीवूडचे अवकाश खुले झाले. सलग 15 वर्ष संघर्ष केल्यावर त्याला मकबूल आणि हासीलसारखे चित्रपट मिळाले. पण त्यानंतर त्याने आन : मॅन ऍट वर्क, चॉकलेट, चेहरे यासह अनेक चित्रपटांत त्याला अपयशच पहावे लागले. मात्र लाईफ इन मेट्रो या सिनेमातील त्याच्या भूमिकेने मात्र अपयशाची ही मालिका खंडित तर केलीच शिवाय या चित्रपटाने त्याच्यावर पुरस्कारांचा अक्षरश: पाऊस पाडला.
2011 मध्ये पानसिंग तोमर या चित्रपटातील त्याच्या जबरदस्त अदाकारीनंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर लंचबॉक्स, हैदर, तलवार, यासह अन्य अनेक चित्रपटात त्याने अजरामर भूमिका केल्या. लंचबॉक्सने राष्ट्रीय पुरस्कारांवर पहिल्यांदा इरफानचे नाव कोरले. पिकू, हिंदी मीडियम आणि अन्य अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरावरच्या चित्रपटात त्याने आपल्या अलौकिक अभिनयाने छाप पाडली.
कलात्मक चित्रपटात छोट्या भूमिका करणारा हा कलाकार नंतर हॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांचा अवडता अभिनेता बनला. ज्युरॅसिक वर्ल्ड, इन्फर्नो, लाईफ ऑफ पाय यांसह अनेक चित्रपटांतील त्याच्या भूमिकांनी जगभरात त्याचे चाहते निर्माण केले. अशा अभिनय समजलेल्या कलाकाराची एक्झिट म्हणूनच मनाला चटका लावणारी आहे.