“खडकवासला’तील पाणी मुरतंय तरी कोठे?

संग्रहित छायाचित्र ...

सर्वच जलसंपदा अधिकाऱ्यांचे मौन


पूर्ण भरलेले धरण पुन्हा 50 टक्‍क्‍यांवर

पुणे – खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना ते 50 टक्के रिकामे करण्याच्या प्रश्‍नावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. धरणसाठा 50 टक्‍क्‍यांवर असताना कालव्याद्वारे 1 हजार 79 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी शेतीसाठी सोडले जात आहे का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत या तीन धरणांमध्ये जेमतेम 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर खडकवासला धरण दि.16 जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर सुरुवातीस कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. नंतरच्या टप्प्यात धरणाचे दरवाजे उघडून नदीमध्ये विसर्ग करण्यात आला. धरण परिसरात हलक्‍या सरी होत असल्याने ओढे-नाल्यांद्वारे धरणात पाणीसाठा होत आहे.

पण, आता मागील दहा दिवसांतच धरण 50 टक्के रिकामे करण्याची बाब निदर्शनास आली आहे. चांगला पाऊस होऊन धरणे भरतील, या आशेवर जलसंपदा अधिकारी धरण आधीच रिकामे करण्यास सुरुवात करतात. मागील काही वर्षांपासून परतीचा पाऊस लांबत असल्याने धरणात कमी पाणीसाठा होतो. त्यामुळे पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. धरणे पूर्ण भरल्यानंतरच धरणातून पाणी सोडण्यात येते. यंदा मात्र धरण पूर्ण भरल्यानंतरही ते निम्मे रिकामे करण्यात आले आहे.

धरणात 50 टक्के पाणीसाठा असतानाही कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन बंद केले. तर काही अधिकाऱ्यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे या नियोजनातच विस्कळीतपणा आल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)