महाबळेश्‍वर पालिकेत शिंदे व मुलाणी यांच्यात खडाजंगी

निधी वर्ग करण्याचा विषय; वाहनतळासाठी भूखंड खरेदी करण्याचा निर्णय

महाबळेश्‍वर – वेण्णा नदी पात्रात पूररेषा आखणी करण्यासाठी सिंचन विभागाकडे निधी वर्ग करण्याच्या विषयावरून नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार शिंदे व नगरसेवक नासीर मुलाणी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. आपण स्वीकृत नगरसेवक आहात याचे भान ठेवून मर्यादेत राहा, असा सज्जड दम कुमार शिंदे याने दिल्याने सभेत नासीर मुलाणी यांना आपली तोफ थंड करावी लागली. दरम्यान याच सभेत सि. स. नं. 255 अ हा भूखंड वाहनतळासाठी खरेदी करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
वेण्णालेक ते लिंगमळा दरम्यान अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी शेतघरे बांधून आपला छोटा- मोठा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो.

परंतु मागील दहा वर्षात वेण्णा नदी पात्रात व पात्रालगत मोठया प्रमाणावर विनापरवाना बांधकामे उभी राहिली आहेत. बांधकामासाठी नदीपात्रात अतिक्रमण करण्यात आले आहे तर काही धनिकांनी नदीपात्राला वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. या बांधकामामुळे व तेथे सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायामुळे नदी पात्र मोठया प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. नदीचे पात्र वाचविण्यासाठी पात्रालगत असलेल्या विनापरवाना बांधकामावर कारवाई करण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढत असून कोणत्याही क्षणी पात्रालगत असलेल्या विनापरवाना बांधकामावर कारवाई होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. या कारवाईसाठी वेण्णा नदीची पूररेषा निश्‍चित करण्याची आवश्‍यकता आहे.

यासाठी लागणारा खर्च पालिकेने सातारा कृष्णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियत्यांकडे वर्ग करण्याबाबत कळविले आहे. पालिकेने या विषयाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवले होते. या विषयावरील चर्चेवेळी नासीर मुलाणी यांनी हा खर्च पालिकेने कशासाठी करावयाचा, असा प्रश्‍न उपस्थित करून चर्चेला सुरूवात केली. त्यावेळी नगरसेवक कुमार शिंदे व नासिर मुलाणी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. नासिर मुलाणी यांनी आपला विरोध कायम ठेवून हा विषय लावून धरला. तेव्हा कुमार शिंदे यांनी स्वीकृत अस्त्र वापरले. तेव्हा मुलाणी यांनी माघार घेऊन शांत राहणे पसंत केले.

हॉटेल पॅनोरमा मागे सुशीला कापडिया यांच्या भुखंडावर पालिकेने वाहनतळाचे आरक्षण टाकले आहे. या आरक्षणामुळे कापडिया यांना या भुखंडाचा विकास करता येत नसल्याने तो भुखंड पालिकेने खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. भूखंड खरेदी करणे का आवश्‍यक आहे व खरेदी केले नाही तर त्याचे परिणाम काय होतील या विषयावर देखील सभेत चर्चा झाली. सर्व सदस्यांनी हा भूखंड खरेदी करावा, असा एकमताने निर्णय घेतला. या निर्णयामुळे बस स्थानक व सुभाष चौक येथे होणारी वाहतुकीची कोंडीची समस्या काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.