नवी दिल्ली – गूगल कंपनीच्या क्रोमबुक या लॅपटॉपचे उत्पादन चेन्नईत सुरू करण्यात आले आहे. यासाठी गुगलने एचपीबरोबर सहकार्य केले आहे, असे गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी समाज माध्यमावर जाहीर केले.
ऑगस्ट 2020 पासून एचपी चेन्नई येथील कारखान्यात लॅपटॉपचे उत्पादन करीत आहे. याच कारखान्यात गुगलच्या क्रोमबुकचे उत्पादन करण्यात येत आहे. यासाठी आम्ही एचपीबरोबर सहकार्य केले आहे असे पिचई यांनी सांगितले.त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना स्वस्त आणि विश्वासार्ह उत्पादने उपलब्ध होऊ शकतील. एचपी या कंपनीच्या प्रवक्तयाने क्रोमबुकचे उत्पादन भारतात सुरू झाले असल्याबद्दल दुजोरा दिला आहे.
ही नवी उत्पादने ऑनलाइन उपलब्ध असून यांच्या किमती 15,990 पासून सुरू होतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हार्डवेअर उत्पादनासाठी केंद्र सरकारने उत्पादन आधारित योजना सुरू केली आहे. यासाठी केंद्र सरकारने 17,000 कोटी रुपये उपलब्ध केले आहेत.
या योजनेसाठी एचपी कंपनीने अर्ज केला होता. नोटबुकपेक्षा मॅकबुकच्या किमती काही प्रमाणात कमी आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्या परवडण्यासारख्या असल्याचे समजले जाते. या उत्पादनाचा वापर जगातील पाच कोटी विद्यार्थी आणि शिक्षक करीत आहेत.
भारतामध्ये या उत्पादनांची निर्मिती झाल्यास भारतीय विद्यार्थ्यांना ती तुलनेने स्वस्त किमतीत मिळू शकतील. एचपीने भारतात 2020 पासून आपल्या उत्पादनात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या उत्पादनात वाढ केली जाणार आहे.