Imran Khan – आदियाला तुरुंगात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर विषप्रयोग केला जाऊ शकतो, अशी भीती इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांनी व्यक्त केली आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांनी एक याचिका दाखल करून इम्रान खान यांच्या सुरक्षिततेबाबत आपल्याला वाटत असलेली चिंता व्यक्त केली आहे.
इम्रान खान यांना अन्नातून विष दिले जाऊ शकते, असे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. इम्रान खान यांना तोषखानाप्रकरणी 5 ऑगस्ट रोजी दोषी ठरवण्यात आले, तेव्हापासून त्यांना तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.
इम्रान यांना अदियाला तुरुंगात पुरेशा सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोपही बुशरा बिबी यांनी केला आहे. यापूर्वीच्या तुरुंगात इम्रान खान यांना घरचे अन्न देण्याची अनुमती होती. मात्र अदियाला तुरुंगात ही परवानगी नाकारण्यात आली आहे.
मात्र हे वर्तन राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारे आहे. यासंदर्भात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्वरित हस्तक्षेप करावा आणि इम्रान खान यांना तुरुंगात योग्य सुविधा देण्याबाबतचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.