पुणे -गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या पुणेकरांना आता मोसमी पावसाचे वेध लागले आहेत. पण, अद्यापही केरळमध्ये दाखल न झालेल्या मान्सूनबद्दल हवामानशास्त्र विभागही दबकत दबकत अंदाज व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुण्यात मान्सून कधी येणार? यासाठी पुणेकर आतूर झाले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सध्या मुंबईपासून सुमारे 1120 कि.मी. अंतरावर अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला (दक्षिण पूर्व) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो पुढील 24 तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात होऊन त्याचा प्रभाव अरबी समुद्राच्या पूर्वमध्य आणि आग्नेय भागांत निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तर, हा निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यानंतर मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते.
सुमारे दि. 8 जूनच्या आसपास किंवा त्यानंतर केरळमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते. तर, आग्नेय अरबी समुद्र आणि दक्षिण केरळमध्ये मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाला असला, तरी पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवाहाला अजूनही अपेक्षित जोर आणि उंची प्राप्त झालेली नाही. या भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पण, सध्याच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही स्थिती बदलू शकते.
दरम्यान, केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यापुढील आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होऊन सुमारे 15 जूनच्या आसपास महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.