मुंबई : अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तबल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात शाब्दिक युद्ध होताना पहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनामध्ये शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. त्यांच्या दाव्याला खोडून काढण्यासाठी शिवसेनेच्या एका आमदाराची पोस्टमोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांचा काही वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी पाडायला गेला होता,” अशा कॅप्शनहीत दानवे यांनी एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे पळताना दिसत आहेत. हा फोटो नेमका कधीचा आहे हे स्पष्ट नसले तरी फडणवीस यांच्यावर राज्यातील राजकारणामध्ये मोठी जबाबदारी सोपवण्याआधी ते कार्यकर्ता म्हणून आंदोलन करताना एका आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेला फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोत भाजपाच्या काही कार्यकर्त्यांसहीत फडणवीस पळताना दिसत आहेत.
दरम्यान, शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या सोशल हल्ल्यानंतर आता भाजपकडून नेमके काय उत्तर देण्यात येईल हे पाहणे गरजेचे आहे.