Sanjay Raut : राजस्थानमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ काही बॅनर राजस्थानात लावण्यात आले होते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला होता. ज्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
“ज्यांनी हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब म्हटलं, ज्यांना हिंदूहृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेब ठाकरे यांना लावायला लाज वाटत होती. म्हणून जेव्हा तुम्ही सत्तेत होता त्यांना वंदनीय म्हटलं गेलं. मला आमच्या महाज्ञानी, विश्वप्रवक्ते राऊतांना विचारायचंय जेव्हा त्यांना जनाब संबोधलं गेलं तेव्हा काहीच वाटलं नाही का? जेव्हा त्यांना जनाब संबोधलं गेलं तेव्हा तुम्ही गप्प बसला होता. आता जे एकनाथ शिंदेंवर प्रेम करतात अशा काही शिवसैनिकांनी त्यांना हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावली असेल तर तुमच्या पोटात का ढवळलं गेलं.”
पुढे त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीही स्वत:ला पक्षाचे प्रमुख असंही म्हटलं नाही. त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते असं पद दिले आहे. त्यामुळे आम्हाला या पदाची कधीही गरज नव्हती. हिंदुहृदयसम्राट हे एकमेव बाळासाहेब ठाकरेच आहेत. त्यामुळे उगीच दोरीला साप म्हणून धोपटू नये आणि हिंदूहृदयसम्राट ही उपाधी तुम्ही सत्तेत असताना का नाकारली याचं उत्तर जनतेला द्यावं,” अशी मागणीही त्यांनी केली.
काय म्हणाले होते राऊत?
“सत्तेसाठी बेईमानी करणा-यांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची नवी परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असावी. बाळासाहेबांनी सत्तेसाठी बेईमानी केलेली नाही. एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट म्हणून काय असं महान कार्य केलं?” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती.