नैराश्‍यावर ग्रासल्यास काय कराल ; काय टाळाल ?

नैराश्‍यावर मात करणे कठीण असले तरी अशक्‍य नाही. नैराश्‍य ही निव्वळ एक मनोवस्था नाही, ज्यातून झटपट बाहेर पडता येईल. यावरचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मदत घेणे. सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टसारख्या मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्यांना भेटणे, ही उपचारांमधली सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

बऱ्याचशा केसेसमध्ये औषधोपचार आणि कौन्सेलिंग थेरपीजने चांगला फरक पडतो. नैराश्‍याने ग्रासलेल्या आपल्या प्रिय व्यक्‍तीला कळू द्या की, त्यांची तुम्हाला काळजी वाटते आणि त्यांच्यासाठी तुम्ही आधार म्हणून आहात. त्यांच्या वेदना आणि झुरणे खरे आहे, कदाचित तुम्हाला त्यामागचे कारण समजू शकणार नाही. त्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी बाणवण्यास मदत करा. जसे, व्यायाम आणि वेळच्या वेळी औषधे घेणे किंवा थेरपिस्टकडे जाणे.

नैराश्‍यग्रस्त व्यक्‍तीशी आपण धीराने वागले पाहिजे. शब्दांद्वारे त्यांना आधार देणे आणि प्रोत्साहन देणे याचा खूप फायदा होऊ शकेल. उलट, आयुष्यातली सकारात्मक बाजू त्यांना सतत दाखवण्यानेही इतका फरक पडणार नाही. अत्यंत नकारात्मक असण्याबाबत त्यांच्यावर टीका करू नका. त्यांची इतरांशी तुलना करणे टाळा. त्यांच्याशी बोलायला कचरू नका. त्या आपल्या प्रिय व्यक्‍तीला कळू द्या की, तुम्ही तिला/त्याला न जोखता तिच्याशी/त्याच्याशी बोलायला तयार आहात. ही प्रिय व्यक्‍ती नैराश्‍याच्या भरात आपले आयुष्य संपवण्याचा विचार करत असेल तर त्याच्याशी संवाद साधण्यास कचरू नका. त्याला/तिला लवकरात लवकर मदत करा.

यातले सर्वाधिक प्रमाण हे नोकरी करणाऱ्या वयोगटामध्ये दिसते. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये नैराश्‍य आणि उतावळेपणाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. किशोरवयीन मुलांमधले नैराश्‍याचे प्रमाण चिंताजनक आहे. प्रत्येक पाचव्या किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍याची लक्षणे पाहायला मिळतात. नैराश्‍याची लागण ज्येष्ठांनाही होते. भारतात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना नैराश्‍याने ग्रासले आहे. नैराश्‍य इतक्‍या झपाट्याने आपले हातपाय पसरत आहे की, तुमच्या दैनंदिन जीवनातली, तुमच्या आसपास वावरणारी एखादी व्यक्‍ती तरी नैराश्‍याने ग्रस्त आहे, हे वास्तव आहे.

ओळखीच्या एखाद्या व्यक्‍तीला नैराश्‍य आले असल्याचा तुमचा अंदाज असेल तर पुढील लक्षणांवरून त्याची खात्री पटवता येऊ शकेल… मूडमध्ये अचानक बदल होणे, एकदम त्रासिक बनणे किंवा एकलकोंडे होणे. एकट्यानेच बराचसा वेळ घालवणे, दीर्घकाळ आपल्याच खोलीत बसून राहणे. वैयक्‍तिक स्वच्छता न राखणे. कोणत्याही कारणाविना रडू येणे. छंद अचानक सोडून देणे किंवा कामाव्यतिरिक्‍तच्या इतर गोष्टींचा त्याग करणे. भुकेमध्ये फरक पडणे किंवा वजन कमी होणे.

झोपेच्या सवयींमध्ये अचानक बदल होणे (वाढणे किंवा कमी होणे) ऊर्जेची पातळी खालावणे. अचानक मद्य किंवा अंमलीपदार्थांच्या आहारी जाणे. मृत्यूबद्दलचे अतिरिक्‍त विचार करणे, मृत्यू आणि मरण्याबाबत चर्चा करणे.

याबद्दल बोलण्याची गरज का आहे?
आजच्या पिढीतले मृत्यू आणि वेदनादायी जीवनप्रवासामागच्या मुख्य कारणांमध्ये अग्रस्थानी असणारे कारण म्हणजे नैराश्‍य. एखाद्याला नैराश्‍याने ग्रासण्यापूर्वी कोणतेही कारण लागत नाही. बाळाच्या जन्मासारख्या अत्यंत आनंददायी घटनेनंतरही एखाद्या व्यक्‍तीला नैराश्‍य येऊ शकते, त्यामुळेच हा आजार समजून घेणे आणि त्याचा स्वीकार करणे अत्यंत कठीण बनले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.