वारंवार होणारी मळमळ बरी होरील का ?

 कधीतरी होत असलेल्या साध्या उपचारांनी बरी होणारी पण वारंवार होऊ लागल्यास आहारावर तसेच तब्येतीवर देखील परिणाम करणारी एक तक्रार म्हणजे मळमळ व अस्वस्थ करणाऱ्या मळमळ या तक्रारीविषयी-

साधारणपणे मळमळीचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींमध्ये मळमळ कमी करणारी, पित्ताची गोळी घेण्याची सवय जडलेली बघायला मिळते. मळमळ हा त्रास वारंवार होत असल्यास मात्र हा त्रास कशामुळे होत आहे त्याचा शोध होणे आवश्‍यक ठरते. त्या मूळ विकाराचे उपचार घेतल्यावरच ती पूर्ण बंद होऊ शकते. यामुळेच मळमळ उत्पन्न करणाऱ्या विकारांची आपल्याला माहिती असायला हवी.

पित्तप्रधान प्रकृती, वारंवार अति तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ अति खाणे, अति जेवण, उग्र वास, दुर्गंध, कडू चव यामुळे अनेकांना मळमळते. चहा, कॉफी, मद्यपान यांचे अतिसेवन, काही वेळा दूषित अन्न व पाणी सेवनात आल्यामुळे मळमळ उत्पन्न होते. काहींना घाटातील रस्ता, प्रवास सहन न होणे, गाडी लागणे इ. मुळेदेखील मळमळते. महिलांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे, मासिक पाळीच्या वेळी, प्रेगन्सीच्या पहिल्या तीन महिन्यात मळमळते.

मायग्रेनचा विकार, डोक्‍यातील रक्‍तदाब वाढणे, जठराची सुज (गॅस्ट्रायसीस) पित्ताशयाची आलेली सूज, पित्ताशयातील खडा, आतड्याची सूज, अपेडिंक्‍सची सुज, मुतखडामुळे होणारी पोटदुखी, किडनी फेल्युअर, लिव्हरची सूज, कावीळ, रक्‍ताची कमतरता, जलोदर, नैराश्‍य, चिंता, अस्वस्थता, अत्याधिक मानसिक तणाव, यामुळेदेखील मळमळणे ही तक्रार होऊ शकते.

पेनकिलर्स, अँटिबायोटिक्‍स, काही विकारांवरील तीव्र औषधांच्या दुष्परिणामी मळमळ उत्पन्न होऊ शकते.
मेंदूतील गाठ, जठर, लिव्हर इ. चा कॅन्सरच्या विकारामुळे मळमळ उत्पन्न होऊ शकते. केमोथेरपी, रेडिओथेरपी यांचे साईड इफेक्‍टमुळेदेखील मळमळते.
मळमळीवरील आयुर्वेदिक उपचार-
मळमळ का होते याचे कारण शोधून त्यानंतर रुग्णाचे वय, प्रकृती इ. अष्टविध परीक्षा करून आयुर्वेदिक उपचार केले जातात.

कारण कोणतेही असले तरी ही बहुतांश वेळी पोटातील पित्त प्रकोप होत असतो. आयुर्वेदाप्रमाणे पित्तावर संशमन, संशोधन असे द्विविध उपचार केले जातात.
शमन करण्याकरिता आवळा, ज्येष्ठमध, सुंठ, एला, कचोरक, गुळवेल सत्व, लवंग, बिल्व, शतावरी इ. वनस्पती शंख, शंरवजीरक, प्रवाळ, माक्षिक, गैरिक, मौक्‍तिक इ. भस्मे यापासून तयार झालेली संयुक्‍त औषधे वापरली जातात. दोष जास्त असल्यास विरेचन, बस्ती या पंचकर्माचा वापर केला जातो. हे उपचार करतानाच मळमळीचे कारण असणाऱ्या मूळ आजाराचे उपचार देखील करणे महत्त्वाचे असते.

वारंवार मळमळ होणाऱ्या व्यक्‍तींनी आवळा सुपारी, वेलदोडे, बडीशेप, खडीसाखर, मोरावळा, लिंबू , डाळींब, लाह्या यांचा उपयोगी करावा. वारंवार मळमळ होणाऱ्या अनेक रुग्णांना शास्त्रीय आयुर्वेदिक उपचारांनी निश्‍चितपणे लाभ होतो.

आयुर्वेदाचार्य
– डॉ. आनंद ओक

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.