बंगळुरू : कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दी जमवण्यास सरकारकडून बंदी आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनही सुरू आहे. पण तरीही अनेक ठिकाणी लोक निष्काळजीपणे वागत करोनाचे नियमांचे उल्लंघन करत आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकच्या बेळगावमधून समोर आला आहे. याठिकाणी चक्क घोड्याच्या एका अंत्यसंस्कारात हजारोंची गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले.
करोनाच्या संकट काळामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी मिळालेली नाही. एवढंच काय पण अंत्यसंस्काराच्या विधीलाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीलाच परवानही दिली जात आहे. मात्र बेळगावमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झालेला हा घोडा एका आश्रमाशी संबंधित होता. त्यामुळे धार्मिक भावनेतून या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे समोर आले.
#WATCH Hundreds of people were seen at the funeral of a horse in the Maradimath area of Belagavi, yesterday, in violation of current COVID19 restrictions in force in Karnataka pic.twitter.com/O3tdIUNaBN
— ANI (@ANI) May 24, 2021
कोन्नूरच्या जवळ असलेल्या कदासिद्धेश्वर आश्रमातील हा घोडा होता. समोर आलेल्या माहितीनुसार आश्रमातील या घोड्याची आधी पुजा करण्यात आली होती. त्यानंतर जगातील कोरोना नष्ट व्हावा म्हणून या घोड्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर हा घोडा दोन दिवस गावामध्ये चरत होता. पण अचानक त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची अंत्ययात्रा पाहण्यासाठी ही हजारोंची गर्दी जमा झाली.
घोड्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारापूर्वी पावदेश्वर स्वामी यांनी पुजा केली होती. त्यानंतर या घोड्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. घोड्याच्या अंत्यसंस्काराचा जो व्हिडिओ समोर आला आहे तो मरादीमठ याठिकाणचा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सद्या स्थानिक प्रशासनानं परिसर सील केला आहे. 400 घरं असलेल्या या संपूर्ण वस्तीला सील करण्यात आलं असून काही दिवस या परिसरात येण्यास किंवा येथील कोणालाही बाहेर जाण्यास परवानगी नसणार आहे. येथील सर्व रहिवाशांच्या COVID-19, SARI आणि ILI च्या चाचण्या सध्या केल्या जात आहेत.