पुणे – महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी करणारे निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयांना विरोध करण्यासाठी आपण वेळोवेळी आवाज उठवत आहोत. मात्र, पालिकेच्या नगरसेवकांची बैठक बोलाविली जात नसल्याने या प्रश्नांचा उहापोह होत नाही. त्यामुळे, महापालिका निवडणूका अवघ्या एका वर्षावर आल्या असून या होणाऱ्या उधळपट्टीबाबत कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी पालिकेतील कॉंग्रेसचे माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्राद्वारे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे केली आहे.
या पत्रामुळे महापालिकेतील पक्षाच्या नगरसेवकांमध्ये असलेली धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. तर शिंदे यांनी या पत्रात थेट कोणावरही आक्षेप घेतला नसला तरी, महापालिकेच्या पक्षातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कॉंग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
शिंदे यांनी शहराध्यक्षांना दिलेल्या पत्रानुसार, महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून चुकीच्या पद्धतीने विविध विषय मान्य केले जात आहेत. त्यामुळे करदात्या पुणेकरांची लूट होत आहे. त्यात, पीपीपीवर रस्ते विकसन, शहरातील ठराविक रस्त्यांचे रूंदीकरण, कचरा प्रकल्पांसाठी निविदा न काढता मंजूरी अशा कामांचा समावेश आहे, या माध्यमातून भाजपकडून पुणेकरांच्या पैशातून ठेकेदारांचे हित साधले जात आहे.
या विषयी मी अनेकवेळा चर्चा करण्याचा व आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकांची बैठक होत नसल्याने या प्रश्नांचा उहापोह होत नाही. त्यामुळे या पैशाची उधळपट्टी थांबविण्यासाठी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या भूमिकेमुळे पालिकेत कॉंग्रेसच्या होणाऱ्या फरफटीवरही बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.