मुंबई – राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांनी पुन्हा एकदा पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवारांनी दिल्ली गाठून अमित शहा यांचीसुद्धा भेट घेतली.
या स्थितीत दोन्ही गट आमदार अपात्रता प्रकरणी कोर्टात तर पक्ष कुणाचा यासाठी निवडणूक विभागात लढाई लढत असताना दुसरीकडे मात्र आगामी हिवाळी अधिवेशनात या दोन्ही गटासाठी एकच कार्यालय असणार आहे.
तेव्हा राष्ट्रवादीत चालले तरी काय हा प्रश्न पुन्हा एकदा पडला आहे. डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी मंत्री, आमदारांचे कक्ष सजवले जात आहे.
विधानभवन परिसरात आमदारांना बसण्यासाठी पक्षनिहाय स्वतंत्र कार्यालय दिले जाते. मागील अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांना स्वतंत्र कक्ष देण्यात आले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी यावरून मोठा वाद झाला होता.
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा घेतला होता. हा वाद अध्यक्षांपर्यंत गेला. त्यानंतर एकाच कक्षाचे विभाजन करण्यात आले होते.
शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाल्याने या दोन्ही गटांना वेगवेगळे कक्ष दिले जाणार अशी शक्यता होती. असे असताना मात्र, नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकाच कार्यालय देणार येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेत स्वतंत्र कक्ष देण्यात यावा अशी मागणी करणारा कुठलाही अर्ज अद्यापही दोन्ही गटाकडून करण्यात आलेला नाही.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दोघे जण आता याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.