नवी दिल्ली – गुजरातमध्ये (Gujrat) आज चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिवाळी (Diwali) आणि छठ पूजेसाठी अनेक परराज्यातील लोकांनी सूरत स्टेशनवर मोठी गर्दी केली होती. यावेळीच चेंगराचेंगरीची घटना घडली. (Surat railway station)
सूरतच्या खासदार आणि केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश (Darshana jardosh) जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या. या घटनेवर पोलीस अधीक्षक (पश्चिम रेल्वे) म्हणाले, सकाळी सूरत रेल्वे स्थानकावरून ताप्ती गंगा एक्स्प्रेस (Ganga xpress train) ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली. तेव्हा प्रवाशांमध्ये गोंधळ झाला आणि काही लोक बेशुद्ध झाले. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाल्याने काही प्रवाशांना अस्वस्थता आणि चक्कर आली.
एसएमआयएमईआर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी जयेश पटेल म्हणाले, गर्दीमुळे एक व्यक्ती कोसळला आणि त्याला मृत घोषित करण्यात आले. त्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल. अन्य दोन प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्टेशनवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.