लोणावळा -लोणावळा शहरात सहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू केला आहे. असे असतानाही विनाकारण तसेच खोटी कारणे सांगत रस्त्यावर फिरणाऱ्या 225 जणांवर कारवाई करीत त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
या सर्व पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या नागरिकांची रवानगी कोविड केअर सेंटरला केली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी मावळ तालुका प्रशासनाकडून लोणावळा, तळेगाव, वडगाव व कामशेत शहरांमध्ये शुक्रवार (दि.7) ते बुधवार असा सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. तीन दिवसांपूर्वी याची घोषणा केली. विविध माध्यमांमधून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविल्या नंतरही शुक्रवारी सकाळपासून बाजारात बिनकामाचे फिरणारे कमी नव्हते. या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांची अँटिजेन तपासणी मोहीम हाती घेतली. दुपारपर्यंत 225 जणांची तपासणी केली.