मुंबई – फडणवीस यांच्यावर बोलण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला. ते महापौर होते. मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेते होते. आता ते अर्थमंत्री आहेत. तुमचं काय कर्तृत्व आहे. वडिलांची पुण्याई सोडली तर बाकी काय आहे तुमच्याकडे. ठाकरे नाव काढलं तर तुमच्याकडे काहीच नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण ही दुर्दैवी घटना होती. पण उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका वैफल्यातून आली होती.
फडणवीस यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. तरी फडणवीस यांनी संयम बाळगला. ते उद्धट ठाकरे किंवा उद्ध्वस्त ठाकरे असं म्हणाले नाहीत. त्यांनी टीका केली म्हणून आम्ही टीका करणार नाही.
योग्यवेळी त्यांना उत्तर देऊ. टीका करून सहानभूती मिळवू नका. जनतेला सर्व माहिती आहे. तुमचे सर्व खेळ लोकं ओळखतात. वाईट बोलून सहानभूती मिळत नाही. आम्हालाही तिखट बोलता येतं. पण आम्ही तसे करणार नाही.
आमचे तसे संस्कार नाहीत. जनता कामाला महत्त्व देते. तुम्ही अडीच वर्षात काय केलत. आम्ही काय केलं, हे जनतेला माहिती आहे. आज तुम्ही ज्यांच्यासोबत आहात. तेच तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील, असेही ते म्हणाले.