पाचगणी – साडेसहा कोटी रुपये किमतीच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांना पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने काल (दि. 25) मध्यरात्री 1 वाजता महाबळेश्वर- मेढा रस्त्यावर केळघर घाटात पकडले. याप्रकरणी महाबळेश्वरचा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश रामचंद्र पाटील, संतोष खुशालचंद्र जैन (रा. निसर्ग विहार, रत्नागिरी), संजय जयराम सुर्वे (मेढा, ता. जावळी) व अनिल अर्जुन ओंबळे (बोंडारवाडी, ता. जावळी) यांना अटक करण्यात आली आहे.
महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी महांगडे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती सातारच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज आणि सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांना कळवली. त्यांच्या सूचनेनुसार महांगडे यांच्या नेतृत्वाखालील वन विभागाच्या पथकाने काल (दि. 25) मध्यरात्री 1 वाजता महाबळेश्वर- मेढा रस्त्यावरील केळघर घाटात संशयितांना पकडले. त्यांच्याकडे साडेसहा किलो वजनाची उलटी सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत तब्बल साडेसहा कोटी रुपये आहे. या उलटीचा उपयोग उंची अत्तरे व सेंट बनवण्यासाठी केला जातो. वन्यजीव अधिनियमानुसार व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, हाताळणी व विक्री प्रतिबंधित आहे. याप्रकरणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिकारीच ठरले सावज
व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीची माहिती मिळाल्यावर वन विभागाने संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला. या उलटीच्या विक्रीबाबत एजंटांशी बोलणी करण्यात आली. व्यवहार कितीपर्यंत करायचा हे ठरले. एजंटांच्या गाडीचा नंबर संशयितांना देण्यात आला. ही उलटी रत्नागिरीतून एसटी बसमधून महाबळेश्वरमध्ये आणल्यावर संशयितांनी ती खासगी वाहनातून मेढा रस्त्यावर केळघर घाटात नेली. तेथे एजंटांनी संशयितांचा गाडीचा नंबर मागून घेऊन, भेटण्याचे ठिकाण सांगितले. त्यानुसार संशयितांनी त्यांचे वाहन एजंटांच्या गाडीजवळ थांबवली आणि तेथेच ते वन विभागाच्या सापळ्यात अडकले. व्हेल माशाची उलटी विकत घेणारे एजंट वन विभागाचे अधिकारीच असल्याने संशयितांना अलगद पकडण्यात आले. त्यामुळे शिकारीच सावज ठरले, अशी चर्चा आहे.
=======================