फलटण – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या 30 वर्षांपासून सक्रिय असलेल्या संजीवराजे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने फलटण शहर आणि तालुक्यात जल्लोष करण्यात येत आहे. संजीवराजे यांनी आतापर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष, फलटण पंचायत समितीचे सभापती आणि इतर अनेक पदांवर काम करून, आपला ठसा उमटवला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजीवराजे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आ. रामराजे, आ. दीपक चव्हाण, आ. मकरंद पाटील, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर व मान्यवरांनी अभिनंदन केले.