ऍण्टिग्वा – डॅरेन ब्राव्हेच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर यजमान वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला व तिन एकदिवसीय सामन्यांची मालिका तिसऱ्या सामन्यातील विजयासह 3-0 अशी निर्विवाद जिंकली. या पराभवामुळे श्रीलंका संघाला टी-20 मालिकेसह एकदिवसीय मालिकाही गमवावी लागली असून एकदिवसीय मालिकेत त्यांच्यावर व्हाइटवॉश स्वीकारण्याची नामुष्की आली.
प्रथम फलंदाजी करताना वनिंदू हसरंगा व असेन बंदारा यांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 6 बाद 274 धावा केल्या. विजयासाठी आवश्यक धावांचे लक्ष गाठताना ब्राव्होने अफलातून शतकी खेळी केली. त्याला साथ देताना शाय होप व कर्णधार कॅरन पोलार्ड यांनीही अर्धशतकी खेळी केली. वेस्ट इंडिजने 5 गडी गमावून 49 व्या षटकातच विजयासर शिक्कामोर्तब केले.
मधमाशांमुळे खेळाडूंची मैदानावरच लोळण
ऍण्टीग्वा येथील सर व्हिवीयन रिचर्डस क्रिकेट मैदानात खेळवण्यात आलेल्या या तिसऱ्या सामन्यादरम्यान मधमाश्यांनी मैदानावर धुमाकूळ घातला. श्रीलंकेचा संघ फलंदाजी करत असताना 38 व्या षटकात अचानक मैदानावर मधमाशा दाखल झाल्यामुळे खेळ थांबवावा लागला. श्रीलंकेचे दोन्ही फलंदाज, वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू व दोन्ही पंचांनी मैदानावरच लोळण घेत आपला बचाव केला. त्यानंतर काही वेळाने मधमाशा दूर गेल्यावर खेळ पुन्हा सुरू झाला. या प्रसंगात कोणालाही इजा झाली नाही.
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका – 50 षटकांत 6 बाद 274 धावा. (वनिंदू हसरंगा नाबाद 80, असेन बंदारा नाबाद 55, अकिल हुसेन 3-33). वेस्ट इंडिज – 48.3 षटकांत 5 बाद 276 धावा. (डॅरेन ब्राव्हो 102, शाय होप 64, कॅरन पोलार्ड नाबाद 53, सुरंगा लकमल 2-56).