नवी दिल्ली – देशात करोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे संपूर्ण देश करोनाशी लढा देत आहे. अशा स्थितीतही देशातील बलात्काराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाही. टीकरी बॉर्डरवर युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघड झालं असून पीडितेचा करोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असं की, पश्चिम बंगालमधून एक युवती टिकरी बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सामील होण्यासाठी आली होती. त्याचळी तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. युवतीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तिचा करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचं निधन झालं. पीडितेचा करोना रिपोर्ट २६ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी सहा लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची ओळख पटली असून यामध्ये अनिल मलिक, अनुप सिंह, अंकुश सांगवान आणि जगदीश बराड यांच्यासह दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन निरक्षकांची एक टीम तयार करण्यात आली आहे.