वाघोली : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सूचना देण्यात आले आहेत की, ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद विकास योजना या नावाने बँक खाते उघडून या बँक खात्याचा व्यवहार संबंधित गावचे ग्रामसेवक आणि तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्या नावाने करण्यात यावा. यामध्ये या खात्याद्वारे जिल्हा परिषद निधी, शासन निधी, इत्यादी योजनांचे कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्हा परिषद विकास योजना नावाच्या बँक खात्यात द्वारे सरपंचांचे अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.
या तक्रार निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रामपंचायत ही घटनात्मक संस्था असून सरपंच हा या सर्वोच्च प्रमुख आहे. ग्रामपंचायत माध्यमातून सरपंचांना सर्व अधिकार प्राप्त झाले असताना देखील विकास योजनेच्या व त्याच्या व्यवहारापासून सरपंचांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. तालुक्याचे गटविकास अधिकाऱ्यांना इतक्या मोठ्या संख्येने गावपातळीवर काम करणे अशक्य आहे. गावातील वाडी वस्तीची माहिती पूर्णपणे सरपंचांना असताना देखील विकास कामे अर्धवट झाली किंवा त्यात काही अडचणी आल्या याबाबत प्रत्यक्ष माहिती नसणाऱ्या व्यक्तीला बँक खात्याचा अधिकार देण्यात येत असल्याच्या बाब अशोभनीय आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी हे पत्र काढताना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पत्राचा आधार घेतला आहे हे परिपत्रक काढण्यामागे राज्य शासन, जिल्हा परिषद सभा, विषय समिती, सभापती किंवा कोणत्या पदाधिकारी यांनी सूचित केले आहे हे अद्याप कळलेले नाही. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येऊ नये यासाठी ची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली आहे.
‘ग्रामपंचायती च्या सरपंचांना पूर्वी प्रमाणे वित्तीय अधिकार प्राप्त व्हावेत. सरपंच हा ग्रामपंचायतीचा विकासाचा आलेख उंचावणारा एक भाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पूर्वीप्रमाणे अधिकार प्राप्त व्हावेत.’
– नवनाथ काकडे (अध्यक्ष, सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य)
जिल्ह्यातील विकासाभिमुख नेता म्हणून सरपंच यांची ओळख आहे सरपंचांना पूर्वीप्रमाणे अधिकार जर दिले गेले नाहीत तर पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– दादासाहेब सातव पाटील (उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा )