कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच काही नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना पहायला मिळत आहे. अशातच या निवडणुकीत भाजप पक्षाला टक्कर देण्यासाठी तृणमूल पक्षाने कंबर कसली आहे. मतदारांची मने जिंकण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी येत्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या पाऊलावर पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे.
सोशलवर व्हायरल झालेल्या व्हिडियोनुसार, दीदींनी पश्चिम बंगालमधील नंदीग्राममध्ये आपल्या हातानं सर्वांना चहा दिला , यामुळे चर्चांना उधाण आलं. सोशलवर पंतप्रधान मोदींच्या मार्गावर चालल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यांच्या या व्हिडियोमुळे सध्या पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेय.
ममता बॅनर्जी या विधानसभेच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यासाठी ममता बॅनर्जांनी आज नंदीग्राममध्ये जाहीरसभा घेतली. यासभेतून ममतांनी आपणही हिंदू असल्याचं सांगत भाजपवर हल्लाबोल केला. तसंच व्यासपीठावरच चंडी पाठ म्हटला. ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातून उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी वातावरण निर्मिती करत सभा घेतली.
दरम्यान, भाजपाने प. बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासूनच शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. भाजपाचे अध्यक्ष नड्डा आणि माजी अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प. बंगालचा दौरा केला होता. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी तृणमूल आणि ममता बॅनर्जी यांच्यावर अनेक आरोप केले होते. या पदयात्रेत ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला.