वेल्हे -वेल्हे तालुक्यातील कातवडी येथील 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या पोटात दुखू लागल्याने उपचार करण्यासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. डॉक्टरांनी त्यांना करोना चाचणी करायला सांगितल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील एका व्यक्तीची स्वॅब वेल्हे येथील कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन पुढे पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
कातवडी गावच्या हद्दीलगत असलेल्या कोळवडी गावामध्ये लॉकडाऊन कालावधीमध्ये मुंबईहून आलेल्या व परत मुंबईला कामासाठी गेलेल्या 48 वर्षीय व्यक्तीस करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून, या व्यक्तीने गावाकडे असणारे कुटुंब घेऊन जाण्यासाठी कोळवडी गावात येऊन पुन्हा दोन ते तीन दिवस मुक्काम केला आहे. त्यामुळे गावातील अनेक व्यक्तींच्या ते संपर्कात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या व्यक्तीच्या संपर्कातील तीन जणांना तपासणीसाठी आरोग्य विभागाने वेल्हे येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेले आहे. त्यांचे स्वॅब पुढे तपासणीसाठी पाठविली आहे. या परिसरातील कोळवडी व कातवडी गावे सील करण्यात आली असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. वेल्हे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली असून, 34 रुग्ण बरे झाले असून, तीन जणांवर उपचार सुरू आहेत.