माहिती अधिकार कार्यकर्ता, निलंबित पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांवर खंडणीचा गुन्हा
पुणे – शहरातील व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी व काही कोटी रुपयांची जागा नावावर करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता, ज्येष्ठ पत्रकार, निलंबित पोलीस कर्मचारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात निलंबित पोलीस कर्मचारी शैलेश जगताप (रा. भवानी पेठ), पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (रा. प्रियदर्शन सोसा. सिंहगड रोड) आणि संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. तर, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे (रा. लुल्लानगर, कोंढवा) अमोल सतीश चव्हाण (चव्हाणवाडा, कोथरुड) आणि एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुधीर कर्नाटकी (64, रा. राजगड, पौड) यांनी फिर्याद दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर असे, की तृप्ती (नाव बदलले आहे) यांच्याबरोबर फिर्यादी कर्नाटकी यांची मैत्री होती. त्यांनी दोघांच्या नावावर सदनिकाही खरेदी केली होती. तिने फिर्यादीशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा गैरफायदा घेत बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तिने आरोपी शैलेश जगताप, रवींद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैन यांच्या मदतीने फिर्यादीची तिच्याबरोबर संयुक्त बावधन येथील सदनिका स्वत:च्या नावावर करुन घेतली. तसेच सहा लाख रुपयांची मागणी करुन त्यापैकी दीड लाख रुपये स्वत:च्या खात्यावर खंडणी स्वरुपात घेतले.
त्या व्यतिरिक्त आरोपी शैलेश जगताप, रवींद्र बऱ्हाटे, अमोल चव्हाण आणि देवेंद्र जैन यांच्याशी हातमिळवणी करुन कटकारस्थान रचले. त्यांनी फिर्यादीला फोनद्वारे, प्रत्यक्ष भेटून तसेच रस्त्यात दुचाकी आडवी घालून “तृप्तीचे प्रकरण सोपे नाही’ अशी धमकी दिली. यानंतर फिर्यादीच्या भागीदारालादेखील बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्या बदल्यात दोन कोटी रुपये आणि रास्ता पेठेतील जागा स्वत:च्या नावावर करुन देण्याची मागणी केली.
याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक के. बी. बालवडकर करत आहेत. “तृप्तीचे प्रकरण सहज समजू नकोस. आम्हाला दोन कोटी रुपये, रास्ता पेठेतील सर्व्हे नंबर 481 येथील जमीन लिहून दे. तसेच त्या जमिनीवर पाय ठेवलास तर जीव घेऊ’ अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.