नवी दिल्ली – टीटीई अर्थात (प्रवास तिकीट परीक्षक) जो सहसा तिकीट तपासतो आणि तिकीट नसल्याबद्दल दंड आकारतो. हे काम सामान्य आहे. मात्र बिहारमधील एका टीटीईने हे सामान्य काम आपल्या चिकाटीच्या जोरावर खास बनवले आहे.
पाटणा जंक्शन येथील टीटीई शशी कुमार कार्यरत आहेत, ज्यांनी अप्रतिम काम केले आहे. चालू आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये, शशी कुमार यांनी 16,423 प्रवासी विनातिकीट पकडले. ज्यांच्याकडून 1 कोटी 11 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांची मेहनत पाहून रेल्वे विभागही अचंबित झाला आहे.
पूर्व मध्य रेल्वेमध्ये अशी कामगिरी करणारे शशी कुमार एकमेव टीटीई आहेत. पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत पाच विभाग आहेत. ज्यामध्ये शेकडो कर्मचारी तिकीट तपासणी कर्मचारी म्हणून काम करतात. मात्र असा विक्रम यापूर्वी कोणीही केला नाही.
1 कोटी 11 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल करणे सोपे काम नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तिकीट तपासणी कर्मचार्यांमध्ये ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शशी कुमार हे पूर्व मध्य रेल्वेचे पहिले टीटीई देखील असू शकतात, ज्यांनी एवढी मोठी रक्कम दंड म्हणून वसूल केली आहे.
तरुणाचे प्राण वाचवल्याबद्दल सन्मान
टीटीई शशी कुमार यांचा रेल्वे विभागाने यापूर्वीच सन्मान केल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी दानापूर स्थानकाच्या फलाटावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या इंजिनवर एक तरुण चढत होता. विजेच्या तारेला स्पर्श करताच तरुणाला शॉक लागला. यावेळी घटनास्थळी उपस्थित टीटीई शशी यांनी आपल्या गमछाच्या सहाय्याने तरुणाला वाचवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या कामाबद्दल टीटीई शशी यांचा रेल्वे अधिकाऱ्यांकडून गौरवही करण्यात आला होता.