इस्रायलविषयी विशेषतः त्यांच्या दहशवाद विरोधी धोरणाविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक मराठीत आले आहे. इस्रायलचे दहशतवाद विरोधी धोरण हे नेहमीच वास्तववादी राहिलेले आहे. डेव्हिड बेन गुरीयन असो की गोल्डा मेयर असो रॉबिन असो की शिमॉन पेरेझ असो.
वेळोवेळी राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी निर्णय घेतले. इस्रायलने बचावात्मक, आक्रमक आणि दंडात्मक असे धोरण राबवले. अंतर्गत सुरक्षा आणि त्यासाठी सदैव कठोर अंमलबजावणी इस्रायलने केली. मोसादचे कार्य सुद्धा ह्यात महत्त्वाचे आहे. मोसादची कार्यपद्धती, मोसादच्या जगातील कारवाया ह्यांचा विशेष आढावा ह्या पुस्तकात घेतलेला आहे.
तेल अवीव ते मुंबई हे महत्त्वाचे प्रकरण यात आहे. मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला तसाच पूर्वी इस्रायलच्या तेल अवीववर झाला होता. त्यावेळी इस्रायलने काय केले होते त्याचे वर्णन यात आहे. मुंबईला वेठीस धरून देशाच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला केला गेला होता. मुंबई हल्ल्यात भारतातील ज्यूंनासुद्धा लक्ष्य केले गेले होते. दहशतवाद हे एक समान आव्हान भारत आणि इस्रायल समोर आहे.
आपला शत्रू अण्वस्त्र बनवत आहे ह्याचा सुगावा लागताच इस्रायलने त्याविरोधात धडक कृती केली.
इराणच्या अणुशास्त्रज्ञाना अण्वस्त्र बनवण्याच्या आधीच ठार मारण्याचे सत्र चालवले. या आधीच्या मोसादच्या महत्त्वाच्या कारवाया ह्या पुस्तकात आहेत. इंग्लंडची प्रिन्सेस डायना हिचा मृत्यू तिच्या प्रियकराबरोबर जेव्हा झाला तेव्हा जगात भरपूर चर्चा झाली होती. त्यात मोसादची भूमिका काय होती? मोसादवर आरोप झाले होते. त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन ह्यात आहे. शिवाय पॅलेस्टाइनचे मोठे नेते यासर अराफत यांचे निधन झाले तेव्हा त्याभोवतीसुद्धा संशयाचे जाळे तयार झाले. त्यांचा मृत्यू ही हत्या होती की तो नैसर्गिक मृत्यू होता ह्यावर गदारोळ झाला होता. त्याचा ऊहापोह ह्यात आहे.
महत्त्वाचे म्हणजे ह्यात भारत आणि इस्रायल ह्यांच्या संबंधांचा विस्तृत आढावा घेतलेला आहे. स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत हे संबंध कसे बदलत गेले ह्याचे सविस्तर विवेचनही आहे. तसेच इस्रायल आणि इराण ह्यातील संबंधांवर प्रकाश टाकलेला आहे. क्रुश्चेव्हचे गोपनीय भाषण, एन्टेबी, एली कोहेन, ऑपरेशन डायमंड, सीरियाच्या विरोधातील कारवाई, ऑपरेशन बॅबिलॉन याशिवाय अनेक महत्त्वाच्या कारवाया यात आहेत.
अतिशय ओघवती भाषा आणि गतिमान कारवायांचे वर्णन ह्यामुळे हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते. भरपूर संशोधन आणि अभ्यास करून लेखिकेने हे पुस्तक लिहिलेले आहे. यापूर्वी लेखिकेचे “आत्मघातकी दहशतवाद (मानवी बॉम्ब)’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक मराठीत प्रकाशित झालेले आहे. “दहशतवाद’ हा विषय मराठी साहित्य विश्वात असा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्यामुळे वाचकांनी अवश्य त्याचा लाभ घावा.
लेखिका- रूपाली भुसारी
वरदा प्रकाशन, पुणे, किंमत-320 रुपये
कल्पना कुलकर्णी