पुणे – शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तर शुक्रवारी (दि. 24) जिल्ह्यातील किल्ले सिंहगड परिसरासह काही भागांत हलक्या सरी पडल्या. तर, शहर परिसरात ढगाळ वातावरण होते.
बदलत्या हवामानामुळे पुढील चार दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे दि. 25 रोजी आकाश ढगाळ आणि सकाळी धुके पडेल. दिवसभरात मेघगर्जनेसह हलक्या सरी पडतील. तर दि. 26 रोजी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील काही भागात गारपीट?
राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामध्ये कोकण गोव्यातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर तर दि. 26 रोजी धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघर्जनेसह पाऊस पडेल. तर, मराठवाडा-विदर्भात पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवली आहे.