मॉस्को – सीरियात रशिया आणि तुर्की यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे तेथील मोठा संभाव्य धोका टळला आहे. तुर्कीचे अध्यक्ष तय्यीप एर्दोगन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात सुमारे सहा तास चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी एकेक पाऊल मागे येत शस्त्रसंधी जाहीर केली. त्या देशातील तणावग्रस्त भागात तुर्की आणि रशियाच्या फौजांनी 15 मार्च पासून एकत्रितपणे गस्त घालण्याचे ठरवले आहे.
सध्या त्या देशातल्या इडलिब प्रांतात सीरियाच्या सरकारी फौजा आणि तेथील सरकार विरोधी बंडखोर यांच्यात तुफान धुमश्चक्री सुरू आहे. ती थांबवण्यासाठीही प्रयत्न करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे.
रशियाचा सीरियाच्या लष्करी फौजांना पाठिंबा असून बंडखोरांना काबुत आण्यासाठी रशियाने तेथे आक्रमक भूमिका घेतली होती. तर तुर्की मात्र बंडखोरांच्या बाजूने तेथे लढत आहे. त्यामुळे रशिया आणि तुर्कीत मोठा तणाव निर्माण झाला होता.
रशियाने सीरियात केलेल्या हवाई हल्ल्यात तुर्कीचे अनेक जवान ठार झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली होती. ती आता या युद्धबंदी करारामुळे नियंत्रणात येणार आहे.
या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पुतीन म्हणाले की आम्ही आता तेथे लढाई थांबवण्याचा निर्णय घेतला असून त्याचे चांगले परिणाम आता दिसून येतील. तेथील सामान्य लोकांनाही यातून आता दिलासा मिळेल असे एर्दोगन यांनी सांगितले. सीरियातील युद्धसदृश परिस्थितीमुळे तेथील दहा लाख लोकांनी आत्ता पर्यंत तेथून पलायन केले आहे.