अन्य बॅकांच्या शेअर्सवरही विपरीत परिणाम
नवी दिल्ली – येस बॅंक ही खासगी क्षेत्रातील बॅंक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेतून पैसे काढण्यावर खातेदारांना निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे त्या बॅंकेच्या खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याच भीतीच्या वातावरणामुळे येस बॅंकेच्या शेअर्सच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात गडगडल्या आहेत. मुंबई शेअर बाजारात येस बॅंकेच्या शेअर्सच्या किंमती 25 टक्क्यांनी घसरल्या आहेत.
या बॅंकेच्या स्थितीमुळे अन्य बॅंकांच्या शेअर्समध्येही आज बाजारात मोठी घसरण झाली. त्यानुसार इंडसइंड बॅंकेचे शेअर्स 11 टक्क्यांनी, स्टेट बॅंकेचे शेअर्स 7 टक्क्यांनी तर ऍक्सिस बॅंकेचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले. मुंबई शेअर बाजारातील एकूण बॅंकेक्स तीन टक्क्यांनी घसरला आहे. कालच रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेच्या खातेदारांना पैसे काढण्यावर निर्बंध लागू केले आहेत.
या निर्बंधांनुसार खातेदारांना आता केवळ 50 हजार रूपयेच काढता येणार आहेत. या बॅंकेला कोणतेही नवीन कर्ज अथवा ऍडव्हान्स देण्यासही मनाई करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेच्या मदतीने येस बॅंकेला अडचणीतून बाहेर काढण्याचा निर्णय काल जाहीर झाल्यानंतर काल या बॅंकेच्या शेअर्सच्या दरात तब्बल 27 टक्के वाढ नोंदवली गेली होती.