पुणे – दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. याचे व्यापारी आणि त्यांच्या संघटनांनी स्वागत केले आहे. पुढील काही दिवस परिस्थिती पाहून प्रशासनाने आणखी वेळ वाढवून द्यावा. करोनाच्या नियमांचे पालन करून आम्ही व्यापार करू, असा निर्धार व्यापाऱ्यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना केला आहे.
दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल पालकमंत्री अजित पवार, मनपा आयुक्त विक्रमकुमार यांचे आभार. दुकान बंद असल्याने काही व्यापारी निराश झाले होते. ते यातून बाहेर येतील. सर्व व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरू होईल.
– फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ
व्यापाऱ्यांची मागणी मान्य करून प्रशासनाने निर्णय घेतला, ही आनंदाची बाब आहे. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दहा दिवस पाहणी करून शासनाने वेळ वाढवून द्यावी.
– राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, “फाम’
दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, मार्केट यार्ड भुसार बाजारात दुकानांना सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी द्यावी. कारण, माल उतरवून घेण्यास, पोहोचवण्यासाठी अधिक वेळ लागतो.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर
व्यापाऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. व्यापाऱ्यांना ऑक्सिजन दिल्यासारखे आहे. वेळही वाढवून दिली आहे. व्यापारी करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतरचा नियम पाळून व्यापारी व्यापार करतील. स्वतः ची आणि ग्राहकांची काळजी घेतील.
– सचिन निवंगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघ
फळे, भाजीपाला विभागात दिवसाआड दुकाने उघडण्यास परवानगी आहे. आता दररोज दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. याबाबत प्रशासक मधुकांत गरड यांना भेटून मंगळवारी ही मागणी करणार आहे. आता 11 पर्यंत बाजार सुरू असतो. तो दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.
– विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन