पुणे – एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, मागील महिनाभरात या मागणीत तब्बल 55 टक्क्यांनी घट झाली आहे. पण, पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत मात्र ऑक्सिजन मागणीत घट न होता, ती वाढत आहे. त्यामध्ये सातारा आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
मागील दोन आठवड्यांपासून पुणे शहरातील करोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, पुणे ग्रामीणमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. पण, तुलनेने ऑक्सिजन मागणी सध्या कमी आहे. 29 एप्रिल रोजी पुणे जिल्ह्याला 420 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला जात होता.
तर, आज त्यामध्ये निम्म्याने घट झाली असून, 233 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. तर मागील आठ दिवसांतील तुलनेत 20 मेट्रिक टन मागणी घटली आहे. पण सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनची मागणीत वाढ झालेली दिसून येते.
त्यामध्ये प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा दिवसांत सांगली येथे 2 मेट्रिक टन, मागील महिनाभरात सातारा-13 मेट्रिक टन, सोलापूर-2, तर कोल्हापूर-2 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. येत्या काळात करोना बाधितांची संख्या कमी होण्याची शक्यता असली, तरी प्रशासन मात्र ऑक्सिजन साठा पुरेसा करण्याच्या तयारीत आहे.