मुंबई : ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे सदावर्ते पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना सदावर्ते यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातला शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आम्ही संपवणार असे म्हणत सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी काल एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. मात्र ही टीका करताना त्याची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी यावेळी बोलताना, ‘राज्यातून आपण शरद पवार यांचा वैचारिक व्हायरस आम्ही संपवणार आहोत तसेच यासाठी आम्ही उद्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि बैठकांचे आयोजन करणार आहोत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर प्रश्न विचारला असता त्यांनी “आता हे नवीन काय आहे? म्हणे शरद पवारांना धमकी दिली आहे. पण त्यांना नेमकी धमकी कुणी दिली. शरद पवारांच्या काळातच दाऊद इब्राहिम उदयाला आला आहे. शरद पवारांचा जो वैचारिक व्हायरस आहे, तो व्हायरस आम्ही संपवणार आहोत. येणाऱ्या काही दिवसांत आम्ही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आणि त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेणार आहोत. ती रॅली उद्यापासून आम्ही काढणार आहोत.” अशा गलिच्छ शब्दात त्यांनी पवारांवर टीका केली.
या पत्रकार परिषदेत नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला होता. त्यातही विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोजवळ नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला होता. यावेळी सदावर्ते यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसह जवळच्या खुर्चीवर ठेवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसेच्या फोटोही पुष्पहार अर्पण केला. या सर्व गोष्टीवरून पुन्हा एकदा ते सर्वांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.