दौंड – राज्य राखीव पोलीस बलातील करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहे. दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 ला बुधवारी (दि. 10) जिल्हाधिकारी राम यांनी भेट देऊन करोना परिस्थितीबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप पाटील, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 चे समादेशक श्रीकांत पाठक, गट क्रमांक 5 चे समादेशक तानाजी चिखले, पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली खान, नितीन भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, दौंड वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम डांगे आदी उपस्थित होते.
राज्य राखीव पोलीस बलातील पोलिसांना वैद्यकीय सुविधा देण्यात येणाऱ्या रुग्णालयांना कोणत्याही साधनसामग्रीचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. त्यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासन तात्काळ उपलब्ध करून देईल. करोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना तात्काळ मान्यता दिली जाईल. पोलिसांना कोणत्याही कारणाने तब्येतीचा त्रास जाणवला अथवा करोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी. शासकीय अथवा खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी करोना परिस्थितीची माहिती दिली.
शहरात प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी
जिल्हाधिकारी राम व जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पाटील यांनी यावेळी दौंड येथील गोवा गल्ली व सिंधी गल्ली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. नगरपरिषदेच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे सांगितले.