सातारा/कराड – सातारा जिल्ह्यातील करोना केअर केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयात अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट काल (दि. 9) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कराड तालुक्यातील 12, वाई व सातारा तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि जावळी व फलटण तालुक्यातील प्रत्येकी एक, असे एकूण 20 जणांचे रिपोर्ट करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
फलटण तालुक्यातील वडले येथील 25 वर्षांचा युवक, जावळी तालुक्यातील ओझरे येथील 75 वर्षांचा वृद्ध, कराड तालुक्यातील तुळसण येथील 26, 60, 51 वर्षांचे पुरुष, 28 व 40 वर्षांच्या महिला, केसे येथील 50, 42, 64, 20 व 60 वर्षे वयाच्या महिला, 20 वर्षांचा युवक, शिंदेवाडी येथील 42 वर्षांची महिला, वाई तालुक्यातील वेरुळी येथील 46 वर्षांचा पुरुष, 11 वर्षांचा मुलगा व 26 वर्षांची महिला, सातारा तालुक्यातील कुसवडे येथील 19 व 47 वर्षांच्या महिला, देगाव येथील 55 वर्षांचा पुरुष, यांचा बाधित रुग्णांमध्ये समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 669 झाली आहे. त्यातील 401 करोनामुक्त झाले असून 28 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
कराड तालुक्यातील करोनाची खंडित होत असलेली साखळी केसे आणि तुळसण येथे नवे रुग्ण सापडल्याने पुन्हा सुरू झाली आहे. मुंबईतून आलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासात असलेल्या तुळसण येथील पाच, केसे येथील सहा व शिंदेवाडीतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
कराड तालुक्यात वनवासमाची, मलकापूर, उंब्रज येथील करोनाची साखळी खंडित करण्यात आरोग्य, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व महसूल या विभागांना यश आले आहे. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने हे यश मिळाले आहे. वनवासमाची, उंब्रज, मलकापूर हे हॉटस्पॉट करोनामुक्त झाले आहेत; परंतु मुंबई, पुणे, अन्य जिल्हे व परराज्यातून आलेले नागरिक प्रशासनाची डोकेदुखी ठरले आहेत. त्यातील अनेक जण आपली ओळख आरोग्य विभागापासून दडवत असल्याने अनेक गावांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीतून 10-11 जणांचे कुटुंब दि. 3 जून रोजी केसे येथे परत आले होते. त्यापैकी एका महिलेला त्रास होऊ लागल्याने ती सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली असता, तिच्या करोनासदृश आजाराची लक्षणे दिसली. त्यामुळे तिला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कातील 11 जणांना पार्ले येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यापैकी सहा जणांना करोनाची बाधा झाली असून बाकीच्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे कुटुंब गावात आल्यापासून होम क्वारंटाइन असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रशासनाने संपूर्ण गाव बंद केले आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. तुळसण येथेही मुंबई रिटर्न रुग्णांच्या निकट सहवासातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिंदेवाडीतील महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.