मुंबई – आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अशात पुन्हा एकदा व्हीपचा मुद्दा चर्चेत आला आहे. कारण शिंदे गटाकडून ५५ आमदारांना व्हीप जारी करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. यात ठाकरे गटातील आमदारांचाही समावेश आहे. अशी माहिती शिंदे गटाचे प्रतोत भरत गोगावले यांनी दिली. यानंतर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी याबाबत थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. दोन्हही गटाचे प्रतोत आणि त्यांनी बजावलेले व्हीप यावरून देखील अद्याप स्पष्टता आलेली नाही. यामुळे न्यायालयाने ठाकरे गटातील आमदारांना दोन आठवड्यांसाठी संरक्षण दिले आहे.असे असूनही भरत गोगावले यांनी आम्ही सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केल्याचे सांगितले गेले. यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.
“आम्हाला अद्याप कोणताही व्हीप मिळालेला नाही. व्हीप बजावणार नसल्याचे त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाचे उल्लंघन झाल्यास कोर्टात जाण्याची तयारी असल्याचे देखील प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले”.
काय म्हणाले शिंदे गटाचे प्रतोत गोगावले
“शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आम्ही अधिवेशनात पूर्णवेळ हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. पण अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नाही. ठाकरे गटातील आमदारांसह सर्वांना व्हीप बजवाला आहे” अशी माहिती माध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांनी दिली.