Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज पुणे दौऱ्यावर असून पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. परंतु मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
मराठवाड्यातील कुणबी असून प्रमाणपत्र मिळत नाही हा मूळ मुद्दा होता. सरसकट मराठा आरक्षण द्या ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही. मराठवाड्यातील वंशावळ चेक करून कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसीमध्ये येतात. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्याला आपोआप ओबीसी आरक्षण मिळते. कुणबी नोंद असल्यास प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, पण सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचे भुजबळ म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमली त्याला हरकत नाही. शिंदे समितीला राज्यभर पुरावे पडताळण्याची संमती नव्हती. सर्वच प्रमाणपत्रावर कुणबी लिहिले जात आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू झाला. त्यावेळी २२५ जाती होत्या आज ती संख्या ३७५ झाली आहे. जात प्रमाणपत्र घ्या आणि कुणबीमध्ये या आम्ही कुणालाच अडवलं नाही. खाडाखोड करुन जी कागदपत्रं दाखवली जात आहेत त्यावर आमचा विरोध आहे.”
भुजबळांवर झालेल्या हल्ल्याबाबत ते म्हणाले की, “माझ्यावर हल्ले झाले त्यापेक्षा पोलिसांवर हल्ले झाले, हे महत्वाचे आहे. महिला पोलीस जखमी झाल्या. सध्या पोलीस हातबल झाले आहे. कारण जखमी झाल्यावर कारवाई पोलिसांवरच करण्यात आली. यामुळे यामुळे आता पोलिसांना विश्वास देणे गरजेचे आहे.”