ओतूर -करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या प्रशासन प्रयत्न करीत आहेत. आरोग्य, पोलीस, आशा वर्कर, महसूल व पंचायत विभागातील अधिकारी कार्य करीत आहेत. प्रशासनाच्या सर्व नियमांचे व सूचनांचे काटेकोर पालन करावे. करोनावर मात करण्यासाठी मी शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आहे, अशी ग्वाही आमदार अतुल बेनके यांनी दिली.
ओतूर (ता. जुन्नर) येथे आमदार बेनके यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी, सरपंच, डॉक्टर यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बेनके यांनी अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने बेनके यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी कुमक वाढविण्यासंदर्भात चर्चा केली. बेनके म्हणाले की, पुणे-मुंबईसारख्या शहरी भागातून आलेल्या नागरिकांनी देखील घरातच राहावे. क्वारंटाइन केलेल्या व शिक्का मारलेल्या नागरिकांनी अजिबात बाहेर फिरू नये; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.