राष्ट्रवादीत घुमला नारा राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी
सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी सातारा जिल्हा राष्ट्रवादी भवनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. आम्ही सारे शरद पवार साहेब यांच्याबरोबर असून त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुंबई येथील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याची भूमिका जाहीर केली. या घटनेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठे पडसाद उमटले. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गहिवरून आले. जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनात दाखल झाले.
जिल्हा राष्ट्रवादी भवनासमोर सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तेजस शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलावडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष समिंद्रा जाधव, युवती अध्यक्ष पूजा काळे, अल्प संख्यांक जिल्हाध्यक्ष शफिक शेख, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, मंगेश ढाणे, कोरेगाव तालुकाध्यक्ष प्रथमेश पवार, राजेश लादे, नितीन लवंगारे आदी एकत्र आले. एक नेता एक आवाज शरद पवार, शरद पवार, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो, पवार साहेब राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या आदी घोषणा यावेळी करण्यात आल्या. सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या बरोबर असून पवार यांनी असा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली.