पुणे -अपघातांचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे- बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवलेपूला पर्यंत जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यासह, जड वाहनांचा वेग आता 60 ऐवजी 40 किलोमीटर प्रति तास करण्यात येणार आहे. सेवा रस्त्यावर येणारी जड वाहने रोखण्यासाठी हाइट बॅरीयर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे, अपघातांना मर्यादा घालता येणार आहे. याशिवाय या मार्गावर “ब्रेक फेल’ झालेल्या अवजड वाहनांना महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी एमर्जन्सी एस्केप सुविधा निर्माण करून दिली जाणार आहे.
या रस्त्यावर होणारे प्रणांतिक अपघात रोखण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व संबधित यंत्रणाची बैठक घेतली. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी अधिकाऱ्यांसह सेव्ह लाइफ फाउंडेशन संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अपघातांची कारणे तसेच अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांवरही चर्चा करण्यात आली.
समोर आलेली अपघाताची कारणे
इंधन वाचविण्यासाठी उतारावर वाहने न्यूट्रल करणे.
वाहनचालकांकडून सतत ब्रेक लावल्याने तो निकामी होणे
जड वाहनांकडून वेग मर्यादेचे उल्लंघन
वाहन वेगात असताना लेन बदलणे
दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार
अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून, तो लवकरच केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयास सादर करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यात प्रामुख्याने सेवा रस्त्यांसह, कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलापर्यंत रस्त्यांची उंची वाढविण्यासह इतर उपाय योजनांचा समावेश आहे. हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे “एनएचएआय’चे प्रकल्प संचालक कदम यांनी सांगितले.
महत्वाच्या उपाययोजना…
जड वाहनांची वेग मर्यादा 60 वरून 40 किलोमीटर प्रतितास
जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन
पाच भाषांमध्ये वाहनचालकांसाठी सूचना
स्वतंत्र पोलीस चौकी उभारून क्रेनची सुविधा
सेवा रस्त्यावर जाणारी जड वाहने हाइट बॅरिकेड्स लावून रोखणार
वेग मर्यादा कमी ठेवण्यासाठी चालकांची जागृती