कृष्णा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा

गुरूनाथ जाधव

जलपर्णीमुळे जलतण, डासांना राहण्यास, पैदास करण्यास आमंत्रण मिळते. त्यामुळे हिवताप साथीचा प्रादुर्भाव होवू शकतो. जलपर्णीमुळे शेतीवरही परिणाम होतो. पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या व कालवे ह्यात जलपर्णीने अडथळे निर्माण होतात. शिवाय धरणाच्या भिंती, कालव्यालगतचे पूल या सर्वांना जलपर्णीच्या वजनाने धोका निर्माण होतो. वीजनिर्मितीतही ही वनस्पती पाणी प्रवाहाला प्रचंड अडथळे आणू शकते.

सातारा – क्षेत्र माहुली येथील कृष्णा नदीत पुन्हा एकदा जलपर्णी उगविण्यास सुरुवात झाली आहे. नदीपात्राला जलपर्णीचा विळखा वाढतोय त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत होणे आवश्‍यक बनले आहे. जलपर्णीच्या संकटाने तर सर्वच नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश जलपर्णीच्या वाढीला सहकार्य करतो. जलपर्णी कितीही काढली तरी ती वाढतच राहते, कारण नदीच्या पात्रात तिचे खाद्य वाढून ठेवलेले असते. जलपर्णीचा उगम प्रथम दक्षिण अमेरिकेतील ऍमेझॉन खोऱ्यात झाला. हे जलतण पाण्यावर सहजपणे 3 फूट तरंगणारे, चकचकीत, रूंद, गर्द हिरवट काळपट, मेणचट पाने असलेले, छान मोहक, लिलीसारख्या रंगाचे 6 ते 7 फुले एकत्र असलेले, पोकळ वासा असलेले, दाटीने उगवणारे असे तण आहे. दिसावयास मोहक असल्याने त्याची शोभेची वनस्पती अशी प्रथम गणना करण्यात आली.

पर्यावरण प्रेमी संस्था, व्यक्‍ती यांनी जलपर्णीमुक्त नद्या करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक बनले आहे. सातारा शहरातील बहुतांश नागरिक कृष्णा नदीचे पाणी पीत आसतात प्रदूषणाने भरमसाठ वाढ होत असलेल्या जलपर्णीमुक्त नद्या करण्यासाठी व पाणी प्रदूषण करणाऱ्यांवरती महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाने कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे. यामध्ये प्रदूषण महामंडळ येत्या काळात नद्यामधील जलपर्णी मुक्त करण्यासाठी व जलप्रदूषण रोखण्यासाठी काय भूमिका घेतात हे पाहणे आवश्‍यक ठरणार आहे.

ज्या पाण्यात शहराचे सांडपाणी मिसळते तेथे तर ती हमखासच फोफावतेच. जलपर्णीची वाढ ही दुहेरी पद्धतीने म्हणजे जलपर्णी बियांद्वारे व वनस्पतीजन्य ह्या दोन पद्धतीने होते. जलपर्णीचे बी पाण्यातील चिखलाबरोबर खोलवर तग धरते. पुढे हे बी पाण्यात 20 वर्षांपर्यंत टिकू शकते. आणि ह्यातून जलपर्णी वारंवार फोफावते. त्यामुळेच ह्याचे निर्मूलन अवघड होवून जाते. जलपर्णी ही पाण्यात तरंगणारी वनस्पती आहे. हिचे देठ पोकळ, स्पंजप्रमाणे असतात. त्यावर साधारणत: 5 से. मी. आकार असलेली गर्द हिरव्या रंगाची पाने डोलत असतात.

ही वनस्पती तिला पोषक परिस्थिती मिळाली कि 5 दिवसात दुप्पट गतीने वाढत असते. वर्षात त्यामुळे एका जलपर्णीमुळे लाखो अहिरावण, महिरावण जलपर्णी निर्माण होतात. ही वनस्पती अक्षरश: गालीच्याप्रमाणे फोफावते. त्यामुळे ह्याच्या गर्दतेमुळे पाण्यात प्रकाश किरणांची वाट अडवली जाते. त्यामुळे इतर जलजंतू, इतर जीव, जलवनस्पतीवर विपरीत परिणाम होतो. मुख्यत: पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटते. त्याचबरोबर तापमान कमी होवून जलसृष्टीला आवश्‍यक असणारी प्रकाशसंश्‍लेषण पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे इतर उपयुक्त जैविक पाणवनस्पती वाढीवरही त्याचा परिणाम होतो. दरम्यान, जिल्ह्यात अनेकठिकाणी कृष्णामाईच्या पात्राला या जलपर्णीने ग्रासले आहे. त्यामुळे प्रशासनासह सामाजिक, सेवाभावी संस्थांनीही वाई शहरातील सेवा कार्य समितीप्रमाणे कृष्णेला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.