सदाशिव लोखंडे निवडणूक खर्चात आघाडीवर

निवडणूक खर्चाची शुक्रवारी होणार तपासणी; लोखंडे, कांबळेंच्या खर्चात तफावत

नगर – शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी पाच उमेदवारांचा निवडणूक खर्च एक लाखाच्या पुढे झाला असून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे मात्र खर्चात अव्वल ठरले आहे. या मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात अनेकांच्या खर्चात तफावत आढळून आली आहे. शिर्डी मतदारसंघातील उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची पुढील तपासणी 26 एप्रिल रोजी होणार आहे. या मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला 70 लाख रुपयांपर्यंत निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रत्येक उमेदवाराला दैनंदिन होणारा निवडणूक खर्च सादर करावा लागतो. या खर्चाची खर्च निरीक्षकांकडून तपासणी करण्यात येत असते. त्यानुसार शिर्डीतील उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी 18 एप्रिल रोजी करण्यात आली होती. यावेळी उमेदवारांनी 2 ते 15 एप्रिल या काळात केलेला खर्च तपासण्यात आला होता. आता 16 ते 19 एप्रिल या काळात केलेल्या निवडणूक खर्चाची तपासणी नुकतीच करण्यात आली.

शिर्डीच्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी केल्यानंतर 19 एप्रिलपर्यंत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च 30 लाख 8 हजार 673 रुपये आहे. मात्र लोखंडे यांनी घोषित केलेला निवडणूक खर्च 24 लाख 83 हजार 498 रुपये आहे. याशिवाय कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी आतापर्यंत 3 लाख 84 हजार 339 रुपये निवडणूक खर्च झाल्याचे घोषित केले आहे. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या परिगणित केल्यानुसार कांबळे यांचा खर्च 8 लाख 8 हजार 644 रुपये झाला आहे. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, भाकपचे उमेदवार बन्सी सातपुते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांचा खर्चसुद्धा एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.

सदाशिव लोखंडे यांनी घोषित केलेला खर्च व निवडणूक आयोगाच्या परिगणितानुसार झालेला खर्च यामध्ये 5 लाख 25 हजार 175 रुपयांची तफावत आहे. तर, भाऊसाहेब कांबळे यांनी घोषित केलेला खर्च व त्यांचा निवडणूक आयोगाच्या परिगणितानुसार झालेला खर्च यामध्ये 4 लाख 24 हजार 304 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना निवडणूक खर्चामध्ये त्रुटी आढळून आल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. त्यांना या तफावतीबाबत खुलासा करावा लागणार आहे.

उमेदवारांनी निवडणूक खर्च केला सादर

-सदाशिव लोखंडे (शिवसेना) : 24 लाख 83 हजार 498
-भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (अपक्ष) : 5 लाख 10 हजार 630
-भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस) : 3 लाख 84 हजार 339
-ऍड. बन्सी सातपुते (भाकप) : 2 लाख 21 हजार 200
-संजय सुखदान (वंचित बहुजन आघाडी) : 2 लाख 11 हजार 750
-सुरेश जगधने (बसप) : 95 हजार 535

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.