ऐन मे महिन्यात करावा लागणार पाणी टंचाईचा सामना

मराठवाडी धरणातील पाणीसाठ्यात घट 
सणबूर – पाटण तालुक्‍यातील वांग नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याची ऐन उन्हाळ्यात टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. कारण या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मराठवाडी धरणामध्ये दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे मे महिन्यामध्ये भासणाऱ्या तीव्र उन्हाळ्यात लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यासाठी आत्तापासूनच पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.

पावणे तीन टी. एम. सी. क्षमता असणाऱ्या मराठवाडी धरणाच्या निर्मितीचे काम सन 1997 पासून कासवाच्या गतीने सुरू आहे. मधल्या काळात तर पूर्णपणे बंद असणारे धरणाचे काम पुन्हा 2009 सुरू झाले आणि धरणग्रस्तांच्या विरोधाला न जुमानता प्रशासनाने धरणाची गळभरणी करून एकूण क्षमतेच्या 20 टक्के पाणीसाठा करण्यास सुरवात केली. गेल्या काही वर्षांपासून 0.66 टी. एम. सी. एवढा पाणीसाठा पावसाळ्यात करून त्याचा उपयोग उन्हाळ्यामध्ये पाटण तसेच कराड तालुक्‍यातील अनेक गावांसाठी होऊ लागला. पिण्याचे तसेच शेतीच्या पाण्यासाठी या पाण्याचा वापर केला जात आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून वांग नदीच्या काठावरील अनेक गावामध्ये उन्हाळ्यात जाणवणारी टंचाई कमी झाल्याचे दिसते. त्याचबरोबर अनेक गावामधील शेतीही हिरवीगार झाल्याचे दिसते.

परंतु यावर्षी असणारी उन्हाळ्याची तीव्रता, वळीव पावसाने फिरवलेली पाठ त्याचबरोबर उपलब्ध पाण्याचे प्रशासनाकडून केले जाणारे नियोजन यामध्ये कुठेतरी ताळमेळ नसल्यामूळे आज एप्रिल महिन्याच्या शेवटी धरणातील पाण्याने तळ गाठल्याचे दिसत आहे. कधी नव्हे तो मेंढ गावाला जोडणारा वांग नदीवरील पूल जवळपास उघडा पडलेला दिसत आहे. अजून संपूर्ण मे महिना आणि जून महिन्याच्या किमान 15 तारखेपर्यंत तरी पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणीसाठा शिल्लक ठेवून अजून दीड महिना पाणी पुरविण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. त्यासाठी योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. पावसाळा लांबला तर मात्र अनेक गावांना पाण्याचे पाणी सुध्दा पुरवठा करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे पुढील किमान दीड महिन्याचे पाण्याचे नियोजन प्रशासनाने करणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन उन्हाळ्यात पाटण व कराड तालुक्‍यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल हे मात्र नक्की.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.