वल्लभनगर आगारात भंगार गाड्यांनी व्यापले पार्किंग

भंगार गाड्या वल्लभनगरला पाठवू नयेत

विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात होरपळून खराब झालेल्या गाड्यांची संख्या सध्या वल्लभनगर आगारात मोठी आहे. राज्यभरातून या गाड्या पाठविल्या जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात परिवहन महामंडळाच्या इतरही ठिकाणी जागा आहेत. त्या ठिकाणी या गाड्यांची सोय केल्यास वल्लभनगर आगारात पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. त्यामुळे महामंडळाच्या इतर ठिकाणी असलेल्या जागांवर या खराब गाड्या पाठविण्याची गरज व्यक्त होत आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) आगारात पार्किंगसाठी गाड्यांना जागा अपुरी पडत आहे. आगारात सातत्याने वाढत जाणाऱ्या भंगार गाड्यांचे सांगाडे यास कारणीभूत ठरत आहेत. मोठ्या पार्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या आगाराच्या पार्किंगला भंगार गाड्यांनी व्यापले असल्याने वल्लभनगर व इतर आगाराच्या मुक्कामी येणाऱ्या गाड्यांना आता पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने आगाराबाहेर गाड्या लावण्याची नामुष्की आगारावर आली असून बसेसची सुरक्षा आता रामभरोस झाली आहे.

वल्लभनगर आगाराचे क्षेत्र मोठे असल्याने आगारात पार्किंगसाठी जागा मोठी आहे. यामुळे पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एस.टी आगाराच्या मुक्कामी गाडयांची संख्या मोठी आहे, त्या ठिकाणी मुक्कामी आलेल्या गाड्यांना उभे करण्याची सोय नसल्याने या गाड्या वल्लभनगर आगारात मुक्कामी पाठविल्या जातात. एसटी बसेसबरोबरच शिवशाही बसेसचे प्रमाण वाढल्याने राज्यभरातून येणाऱ्या या गाड्याही वल्लभनगर येथे मुक्कामी पाठविल्या जातात. राज्यभरातून येणाऱ्या एसटीच्या गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात येत असल्याने प्रवाशांना याचा मोठा फायदा आजपर्यंत झाला आहे.

मुक्कामी गाड्या या सकाळी पिंपरी-चिंचवड शहरातून जात असल्याने प्रवाशांना मोठी सुविधा निर्माण झाली होती. सध्या वल्लभनगर आगाराच्या स्वत:च्या मालकीच्या 55 साध्या बस तर, 9 शिवशाही बसेस या मुक्कामी असतात तर शिवाजीनगर व स्वारगेट आगाराच्या सुमारे 180 बसेस आगारात निव्वळ पार्किंग आहे म्हणून मुक्कामी येतात. याशिवाय इतर राज्यांच्याही अनेक बसेस या वल्लभनगर येथे मुक्‍कामी येतात. सध्या भंगार गाड्यांनी जागा व्यापल्याने या गाड्या लावण्याची मोठी अडचणी निर्माण होत आहे.लवकर येणाऱ्या गाड्या या आगारात असलेल्या जागेवर पार्किंग केल्या जात असल्या तरी उशीराने येणाऱ्या गाड्यांची मात्र मोठी अडचण होत आहे. या गाड्या आगाराबाहेर लावल्या जात असल्याने वाहनांची सुरक्षा रामभरोसे ठरत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे राज्यभरात झालेल्या आंदोलनात ज्या गाड्यांचे नुकसान झाले आहे, त्या गाड्या सध्या आगारात पार्किंग करून ठेवण्यात आल्या आहेत. या खराब झालेल्या गाड्यांची तात्काळ विल्हेवाट लावल्यास पार्किंग प्रश्‍न संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या नादुरुस्त अथवा खराब झालेल्या गाड्यांची इतर ठिकाणी सोय करावी, अशी मागणी बसचालक व कंडक्‍टर यांच्याकडून होत आहे.

आगारात जळालेल्या गाड्याचे सांगाडे, भंगार गाड्या, यामुळे आगारातील पार्किंगचा बराच भाग व्यापला आहे. यामुळे आगारातील गाड्या व दुसऱ्या आगारातून मुक्कामी येणाऱ्या गाड्यांना जागा पुरत नाहीत. यामुळे आगाराबाहेर मोकळ्या जागेत गाड्या पार्क कराव्या लागत आहे. ऐन उन्हाळ्याच्या हंगामात पार्किंग प्रश्‍न निर्माण झाल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.

संजय भोसले, आगारप्रमुख वल्लभनगर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.