पिंपळे गुरव – दापोडी येथील गुलाबनगर, जुना गुलाबनगर, पवारवस्ती, विठ्ठल मंदिर परिसरात वारंवार पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच गृहिणींचे नियोजन कोलमडून जात आहे. त्यामुळे दापोडीतील पाणी प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
माजी नगरसेविका स्वाती काटे यांनी नागरिकांची समस्या सोडवून घेण्यासाठी प्रत्यक्ष परिसरात जाऊन पाहणी केली. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. या वेळी रवी कांबळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका शहराला दररोज पाणीपुरवठा करणार आहे. त्यासाठी सातत्याने मुहूर्त काढले जात आहेत. परंतु पुरेसा आणि दररोज पाणीपुरवठा अजून शहरवासीयांच्या नशिबी आलेला नाही. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे.
त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर लागत आहे. परंतु दापोडी परिसरात कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिक नागरिक, कामगार वर्ग हैराण झाला आहे. दापोडीतील गुलाबनगर, जुना गुलाबनगर, पवारवस्ती, विठ्ठल मंदिर परिसरात सर्वसामान्य आणि कष्टकरी वर्ग राहत आहे. त्यांना सकाळी उठून कामावर जाण्याची गरबड असते. परंतु महापालिका प्रशासन वेळेत आणि नियमित पाणीपुरवठा करत नसल्याने महिला वर्गाचे मोठे हाल होत आहेत. तर बहुतांश कामगारांना पाण्यासाठी काम सोडून घरी बसावे लागत आहे. रात्री, अपरात्री महापालिकेकडून या परिसरात पाणी सोडले जाते. त्यामुळे दिवसभर काबाडकष्ट करून आलेल्या नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अशा नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
दापोडी हा शहरातील शेवटचा परिसर आहे. मध्यंतरी रावेतवरून पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे पाणीपुरवठ्यात समस्या निर्माण झाली. परंतु ज्या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही त्या परिसरात रात्री आम्ही थांबून पुन्हा पाणी सोडले.
– चंद्रकांत मोरे,
उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग.