पुणे -महापालिकेची मुदत असल्याने मतदारांना खुश करण्यासाठी जाता जाता शहरातील अनेक नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांनी कामासाठी मान्यता दिलेल्या जागांमध्ये बदल करत खासगी जागांमध्ये विकासकामे केली आहेत. अशा कामांची माहिती घेऊन त्याची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय, मार्चच्या अखेरीस देण्यात आलेल्या वर्कऑर्डरची कामे प्रत्यक्षात झालेली आहेत की नाहीत याची तपासणीही क्षेत्रीय कार्यालये तसेच महापालिकेच्या दक्षता विभागाकडून करून घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
2021-22 हे महापालिकेचे निवडणूकपूर्वीचे वर्ष असल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांकडून 31 मार्चपूर्वी प्रभागातील विकासकामांसाठी लगबग सुरू होती. मात्र, महापालिका आयुक्तांकडून वित्तीय समितीची मान्यता मिळाल्यानंतरच ही कामे केली जात असल्याने अनेक अनावश्यक कामांवर मर्यादा आलेल्या होत्या. त्यामुळे अनेक नगरसेवकांकडून क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून कामे करण्यासाठी वित्तीय समितीत कामासाठी वेगळेच ठिकाण दाखवून मान्यता घेतली आहे. तर, आयत्या वेळी संबंधित ठिकाणी कामासाठी आवश्यक जागा नसल्याचे सांगत परस्पर जागा बदल करून ही कामे खासगी सोसायट्यांच्या आवारात अथवा इतर ठिकाणी करून घेतली आहेत.
त्यामुळे प्रशासकीय पातळीवर ही चूकीची बाब असून मार्च अखेरीस बिले सादर झालेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत 25 टक्के कामे क्षेत्रीय कार्यालयांनीच तपासणी करायची असून उर्वरीत 75 टक्के कामांमधील संशयास्पद कामांची तपासणी दक्षता विभागामार्फत केली जाणार असून गैरप्रकार अथवा जागा बदल झाल्याचे समोर आल्यास अशी बिले दिली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.