नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. त्यात सरकार वेळोवेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी करोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास सांगत आहे. याचाच सकारात्मक परिणाम म्हणून कि काय एका ३ वर्षांच्या चिमुकलीने तिला सर्दी-खोकला जाणवला म्हणून चक्क डॉक्टरचा दवाखाना गाठला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागालँडच्या झुन्हेबोटो जिल्ह्याच्या घटाशी तालुक्यात ही घटना घडली आहे. लिपवी असे या तीन वर्षांच्या चिमुकलीचे नाव आहे. ‘दी मोरंग एक्स्प्रेस’ या स्थानिक वर्तमानपत्रानुसार, लिपवीला सर्दी आणि खोकल्याची सामन्य लक्षणं होती. तिचे आई-वडील हे शेतात काम करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे तिने एकटीनेच हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये चेकअप करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
लिपवी एकटीच मास्क लावून हेल्थ सेंटरमध्ये आलेली पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिचा डॉक्टरसोबतचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लिपवीच्या या कृतीचे अनेकांनी भरभरून कौतुक केले आहे. तसेच तिने नेटिझन्सलाही भूरळ पाडली आहे. सर्वांनाच तिचा एकटीने रुग्णालयात जाण्याचा निर्णय आवडला आहे.
बेंजामिन येप्थोमी यांनी ही मुलगी आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे. जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांच्या लिपवीला हेल्थ सेंटरमध्ये पाहिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले. तिच्यामध्ये सर्दी-खोकल्याची काही लक्षणं आढळून आली आहे. तिचे आई-बाबा शेतात काम करण्यासाठी जातात. त्यामुळे तिने एकटीने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.