नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला होणार् या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तेथे असलेल्या आपल्या नागरिकांसाठी अमेरिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. राजकीय हिंसाचारापासून सावध रहावे, असे या इशार् यामध्ये म्हटले आहे. पाकिस्तानमधील अमेरिकेच्या दूतावासाने हा सावधानतेचा इशारा दिला आहे.
पाकिस्तानमधील राजकीय पक्ष प्रक्षोभक निदर्शने आणि आक्रमक प्रचार करत आहेत. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. तसेच आंदोलने आणि निदर्शनेही होऊ शकतात.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकांच्या दिवशी अनेक ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच हिंसक कारवायाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी मतदान केंद्रांपासून दूरच रहावे, असेही या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.