नवी दिल्ली – इराण युद्ध सुरू करणार नाही. मात्र इराणला धमकावण्याचा प्रयत्न जर कोणी केल्यास त्याचे प्रत्युत्तर नक्की देईल, असे इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी म्हटले आहे. इराणने गेल्या शनिवारी जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळावर केलेल्या मार् यामध्ये अमेरिकेचे ३ सैनिक मारले गेले होते. त्यानंतर अमेरिकेकडून हौथी बंडखोरांच्या विविध ठिकाणांवर वारंवार मारा केला. इराणला अमेरिकेकडून थेट प्रत्युत्तर दिले जाण्याचे संकेत मिळत असतानाच रायसी यांनी हा गर्भित इशारा दिला आहे.
इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळावर ड्रोन हल्ला केला होता. त्यात ४० जण जखमी देखील झाले होते. त्यानंतर इराक आणि सीरियामध्ये इराणशी संबंधित विविध ठिकाणांवरही अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी मारा केला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर इराणने हा इशारा दिला आहे.
लाल समुद्रामध्ये इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांवर हल्ले केले जात आहेत. तसेच लेबेनान आणि इराकमधील इराण धार्जिण्या गटांकडूनही अमेरिकेच्या युद्धनौका आणि तळांवर हल्ले सुरू केले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
इराणशी चर्चा करण्यापूर्वीच अमेरिकेने इराणशी संबंधित ठिकाणांवर हल्ले केले आहेत. आता इराणशी युद्धाची इच्छा नसल्याचे अमेरिका म्हणत आहे. इराण स्वतःहून युद्ध सुरू करणार नाही. मात्र जर कोणी इराणला धमकावले, तर त्याला प्रत्युत्तर नक्की दिले जाईल, असेही रायसी टिव्हीवरून केलेल्या भाषणामध्ये म्हणाले.